परळी औष्णिक विद्युत केंद्रातील बंद संच सुरू करण्यासह विविध विषयी धनंजय मुंडे यांनी साधला ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांशी व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद


परळी ..


: परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ६, ७, व ८ पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासह संच क्रमांक ९ ची मागणी व अन्य विषयी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ऊर्जा विभागाचे मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह महाजनको च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला.


येथील औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक १ ते ५ बंद करण्यात आले असून संच क्रमांक ६ ते ८ पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. संच क्रमांक ६ ते ८ पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावेत, प्रकल्प ग्रस्तांच्या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार होऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावेत, संच क्रमांक ९ ला मान्यता देण्यात यावी या मागण्या यावेळी ना. मुंडे यांनी केल्या. 


या व्हीडिओ कॉन्फरन्स मध्ये राज्य ऊर्जा विभागाचे मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, महाजनको च्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती शैला, संचालक श्री. थोटवे, कोल विभागाचे संचालक श्री. पुरुषोत्तम जाधव, वाणिज्य विभाग संचालक श्री. सतीश चव्हाण, परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री. शिंदे आदी अधिकारी सहभागी झाले होते.


यावेळी ना. मुंडे यांनी बंद झालेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेचा पुनर्वापर,   परळी नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या मल:निस्सारण प्रकल्पातील पाणी औष्णिक विद्युत केंद्राला वापरावे अशी सूचनाही प्रस्तावित केली आहे.


बीड जिल्ह्यातील सबस्टेशनला जागा उपलब्ध करून देण्याची घेतली जबाबदारी


या व्हीडिओ बैठकीमध्ये बीड जिल्ह्यात मंजूर असलेल्या ९२ सबस्टेशनला जागा उपलब्ध नसल्याबाबतही चर्चा झाली, यावेळी ना. मुंडेंनी या सर्व सबस्टेशन साठी जिल्ह्यात ठिकठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आता स्वतःकडे घेतली आहे.


औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ९ परळीत होणार  नसून तो इतरत्र देण्यात येईल अशी चर्चा होती, परंतु संच क्रमांक ९ ला मान्यता देण्यात यावी अशी मागणी आता या बैठकीद्वारे ना. मुंडे यांनी ऊर्जा विभागाकडे केली असून याबाबत ऊर्जा विभाग सकारात्मक असल्याचे समजते.
-––----------------