बीड जिल्ह्यातील कापूस खरेदीचा वेग वाढणार - धनंजय मुंडे

कृषी विभागाच्या 20 ग्रेडर्ससह 16 केंद्रे दोन दिवसात होणार सुरू


 


मुंबई..... : बीड जिल्ह्यातील कापूस खरेदीचा मंदावलेला वेग आता वाढणार असून त्यासाठी जिल्ह्यात 16 खरेदी केंद्रे 20 ग्रेडर्सच्या साहाय्याने सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दिली.


 


लॉकडाऊनमुळे व ग्रेडर्सच्या उपलब्धी मुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. खरेदीचा वेग वाढावा यासाठी ना. मुंडे यांच्याकडून कृषी विभाग व सीसीआयकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रेडर्स उपलब्ध होत नसल्याने आता कृषी विभागाच्या 20 कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत जिल्ह्यातील आणखी 16 कापूस खरेदी केंद्रे दोन दिवसात सुरू करणार असल्याचे ना. मुंडे म्हणाले.


 


जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शिल्लक असलेल्या कापसामुळे, तसेच मान्सून - खरिप हंगाम तोंडावर येऊन ठेपल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता.


 


खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी मुंबईत दाखल झालेल्या ना. मुंडे यांनी कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांच्याशी चर्चा करुन या विषयावर आता तोडगा काढला आहे.


 


कृषी विभागाने ना. मुंडे यांच्या सूचनेनुसार आपले 20 ग्रेडर्स उपलब्ध करून दिले असून, जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या 4 खरेदी केंद्रांवर या ग्रेडर्सला दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल व त्यानंतर या ग्रेडर्स मार्फत जिल्ह्यात 16 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील.


 


मान्सूनच्या तोंडावर जिल्ह्यात शिल्लक असलेल्या कापसाच्या खरेदीला अधिक वेगाने सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.