खरीप हंगामासाठी बँकांना देण्यात आलेला पीककर्ज वाटपाचा लक्षांक विहीत मुदतीत पूर्ण करणे आवश्यक -जिल्हाधिकारी राहुल रेखावार


बीड,...... जिल्हयातील जे शेतकरी खरीप पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2020 - 21 करीता पीक कर्ज पुरवठा होणे आवश्यक असून सदयःस्थितीत या खरीप हंगामासाठी बँकांना देण्यात आलेला पीककर्ज वाटपाचा लक्षांक विहीत मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.
           याबाबत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत बँकांनी शेतक - यांना वेळेवर पीक कर्ज पुरवठा करणेबाबत योग्य ती कार्यवाही करणेबाबत सूचित केले होते. तसेच खरीप हंगाम  सन २०२० -२१ करीता जिल्हयातील सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण , खाजगी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत पीक कर्जवाटप करायचे  लक्षांक निश्चित करण्यात आलेले आहेत, असे नमूद केले आहे . 
 
सर्व राष्ट्रीयकृत, व्यापारी खाजगी, जिमस, ग्रामीण बँक यांनी त्यांना दिलेला खरीप पीक कर्जवाटपाचा लक्षांक विहीत मुदतीत पूर्ण करणेसाठी करायची  कार्यवाही खालीलप्रमाणे आहे. 


१ . वेळोवेळी कर्ज मेळाव्यांचे आयोजन करावेत कर्जमेळावे आयोजित करण्याची जबाबदारी संबंधित तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत, खाजगी, जिमस, ग्रामीण बँकेच्या संबंधित शाखाधिकारी यांची असून त्यांनी मेळावे तात्काळ आयोजित करावेत . 
सदर मेळाव्याच्या तारखा तालुका सहायक निबंधक यांनी संबंधित बँकेच्या सल्ल्याने निश्चित करून जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था बीड कार्यालयास कळवाव्यात जेणेकरून सदर मेळाव्यास जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था व जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांना उपस्थित राहता येईल . 
२ . कर्ज मेळाव्याचे आयोजनाच्या दिनांकाच्या किमान ३ दिवस आगोदर संबंधित गावातील शेतकऱ्यांना मेळाव्यास उपस्थित राहणेबाबत तलाठी, ग्रामसेवक. कृषि सहायक व गटसचिव यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन किंवा दवंडीद्वारे आवाहन करण्यात यावे . 
३ . कर्जमेळाव्यास उपस्थित शेतकऱ्यांचा ७ / १२ उतारा . ८ - अ व ६ - ड उतारा तलाठी यांनी उपलब्ध करून द्यावयाचा असून संबंधित तालुका उप सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी याबाबत सर्व तलाठी यांना अवगत करावे . 
तसेच तालुका उप सहायक निबंधक यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा कर्जबाकी नसल्याबाबतचा नाहरकत दाखला संबंधित संस्थेकडून व्यापारी बँकांना देणेबाबत सूचना निर्गमित कराव्यात . 
४ . व्यापारी बँकांनी  विहीत नमुन्यातील कर्जासंबंधीचा अर्ज मेळाव्यात उपलब्ध करून द्यावा व हा अर्ज भरून देण्यासाठी तालुका उप सहायक निबंधक , जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निरीक्षक व गटसचिव यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे . 
५ . किसान क्रेडीट कार्ड वाटपाबाबतचे मा . सहकार आयुक्त व निबंधक , सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य , पुणे यांचे पत्र दि . १० फेब्रुवारी २०२० चे पत्रानुसार राज्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजना लाभार्थ्यांना यापुढे पीक कर्जासाठी किसान क्रेडीट कार्ड ( KCC ) सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आहेत . तसेच , मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धनासाठी 
(संगोपनासाठी ) कर्जमर्यादा किसान क्रेडीट कार्ड द्वारे मंजूर करण्याची बाब यात समाविष्ट आहे.
          प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना यापुढील पीक कर्जासाठी किसान क्रेडीट कार्ड ( KCC ) सुविधा उपलब्ध करून दयावी . सर्व बँकांनी चालू खरीप हंगामामध्ये किसान क्रेडीट कार्ड ( KCC ) द्वारे पीक कर्ज वाटप करावे . 
६ . खरीप पीक कर्ज वाटप करताना बँकांनी कुठल्याही प्रकारे शाखांमध्ये गर्दी न होता साथरोग प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून शेतकऱ्यांकडून सोशल डिस्टंन्सींगचे पालन करीत कागदपत्रे घ्यावीत . यासाठी बँकांनी पीक कर्जमागणीचे अर्ज घेण्यासाठी  मोठया गावांमध्ये शाखानिहाय नियोजनबद्ध रीतीने मेळावे आयोजित करावेत. तसेच, त्यानंतर या मेळाव्यातून दुसऱ्‍या फेरीत पीक कर्ज वितरण करावे . 
७ . शेतकऱ्‍यांना कर्जमागणी अर्ज सादर करताना लागणारी अर्ज व कागदपत्रांची माहिती बँकांनी उपलब्ध करून दयावीत . तसेच , ७ / १२ उतारा , ८ अ व पीक पेरा इत्यादी कागदपत्रांसाठी महसूल यंत्रणा , सहकार व कृषी विभागाचे अधिकाऱ्‍यांसोबत बैठकीचे नियोजन करावे. 
८. बँकेकडे यापूर्वी केवायसी दिली असेल किंवा केवायसी साठी कागदपत्रे घेतली असतील तर त्यांच्याकडून पुन्हा कागदपत्रे मागू नयेत . 
९ . शेतकऱ्‍यांना पीक कर्ज घेण्यासाठी बँकेत न बोलावता बँक अधिकाऱ्‍यांनी गावागावत जाऊन कर्ज वितरण करावे . 
१० . ज्या शेतकऱ्‍यांचे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ च्या यादीत कर्जमाफीमध्ये नाव आलेले आहे परंतु , त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले सरकार सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण करून प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे त्यांना अदयाप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही , अशा शेतकऱ्‍यांना सदर यादीच्या अधीन राहून नव्याने पीक कर्ज वाटप करावे . 
  ११. बँकांनी त्यांना दिलेला खरीप पीक कर्जवाटपाचा लक्षांक विहीत मुदतीत साध्य करणे आवश्यक आहे . शाखानिहाय खरीप पीककर्ज वाटपाचा लक्षांक व पूर्तताबाबत जिल्हा अग्रणी बँक अधिकारी व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांचेमार्फत विहित नमुन्यातील साप्ताहिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.
तसेच बीड जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याच्या सामाजिक अंतर राखणे , सॅनीटायझरचा वापर व इतर सर्व आनुषंगिक उपाययोजना व अटी शर्तींचे काटेकोरपणे पालन करण्यात अशा सूचना देण्यातआल्या आहेत.
०००००