अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीचा नांदेडमध्ये गळफास

नांदेड : 'खुलता खळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने नांदेडमध्ये आत्महत्या केली आहे. उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आशुतोषने आत्महत्या का केली, यामागील कारण अस्पष्ट आहे. या घटनेने मयुरी देशमुखच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 


आशुतोषने फेसबुरवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओतील व्यक्ती माणूस आत्महत्या का करतो? याबाबत विश्लेषण करताना दिसत होती. मात्र, तरीही आशुतोष इतका टोकाचा निर्णय घेईल, अशी कुणाला कल्पना नव्हती.


खुलता कळी खुलेना' या मालिकेतील भूमिकेने मयुरी प्रसिद्धीच्या झोतात आली. मयुरीने लिहिलेले-दिग्दर्शित केलेले नाटक 'डिअर आजो'ने प्रचंड लोकप्रियता मिळवली. तिचे तिसरे बादशहा हम हे नाटक सुरु होते. याशिवाय डॉ. प्रकाश बाबा आमटे, 31 दिवस अशा काही चित्रपटात ती झळकली आहे.


आशुतोषने 'भाकर', 'इच्यार ठरला पक्का' या चित्रपटात काम केलं आहे. आशुतोष आणि मयुरी देशमुख 21 जानेवारी 2016 रोजी लग्नबंधनात अडकले होते. 2017 साली मयुरीने 'व्हॅलेन्टाईन डे'च्या निमित्ताने 'लोकसत्ता'साठी लिहिलेल्या लेखात आपली लव्हस्टोरी सांगितली होती.