“माझे कुटूंब-माझी जबाबदारी” काळजी घ्या काहीही कमी पडू देणार नाही - पालकमंत्री अशोक चव्हाण

पालकमंत्र्यांनी साधला शिवनगरच्या कुटुंबाशी संवाद डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन 80 खाटाच्या आयसीयू वार्डाची भर  


आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी महिला शक्ती आपले सामर्थ्य लावेल पणाला - जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर 


 


“माझे कुटूंब-माझी जबाबदारी” मोहिमेचा भोसी ग्रामपंचायतीतून शुभारंभ 


 


नांदेड (जिमाका) दि. 15 :- अडचणीच्या काळात कुटुंबाला सावरण्यास आणि आहे त्या परिस्थितीवर मात करीत कुटुंबाला उभे करण्याचे जन्मजात सामर्थ्य महिलांमध्ये दडलेले आहे. वेळोवेळी महिलांने हे आपले सामर्थ्य सिद्ध करुन दाखविले आहे. कोरोनासारख्या महामारीच्या या काळात आता पुन्हा एकदा घरातील सर्व सदस्यांसमवेत महिलांना सज्ज होऊन कुटुंब सावरण्याची जबाबदारी आली असून “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” या मोहिमेत त्या आपले भरीव योगदान देतील अशी खात्री जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी व्यक्त केली. 


 


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याुसाठी महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” या मोहिमेचा प्रातिनिधीक शुभारंभ नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भोसी येथे झाला. यावेळी उद्घाटनपर भाषणात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम, पंचायत समिती सभापती श्रीमती निता राऊलवाड, जिल्हा परिषद सदस्य प्रकाशराव भोसीकर, भोसीचे सरपंच श्रीमती रत्न माला शिंगेवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य डॉ. शिवशक्ती, पवार उपस्थित होते. 


 


मागील सहा महिन्यांपासून शासनाचा आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग व ग्रामीण भागासाठी असलेली सर्व यंत्रणा जीवाचे राण करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करीत आहे. आपल्या आशा वर्कर पासून जिल्हा पातळीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपल्या कुटुंबाला विसरुन जे योगदान दिले आहे त्याला तोड नाही. आरोग्याची ही यंत्रणा जर आपल्याला सक्षम ठेवायची असेल तर प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाने आपआपली जबाबदारी आणि कर्तव्य ओळखून आपले वर्तण हे “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” या न्यायासाठी सिद्ध केले पाहिजे, असे सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी स्पष्ट केले. आपली गावपातळीवरील काम करणारी अंगणवाडी सेविका असो, आशाताई वर्कर असो ही सर्व महिला शक्ती या मोहिमेला केवळ सरकारी उपक्रमाच्या दृष्टिकोणाने पाहणार नाही तर आजवर त्यांनी ज्या गावाला आपले कुटुंब मानले आहे त्या कर्तव्यपूर्तीतून यात योगदान देतील. मी एक महिला म्हणून आमच्या आशाताईला एकटे पडू न देता त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी पुढे सरसावेल असेही त्यांनी स्पष्ट केले. 


 


“माझे कुटूंब-माझी जबाबदारी” ही मोहिम प्रत्येक कुटुंबाला सुरक्षिततेचा मंत्र देणारी असून यात प्रत्येक गावातील लोकसहभाग अधिकाधिक कसा घेता येईल यासाठी जिल्हा परिषदेचे आणि ग्रामपंचायतीचे सर्व प्रतिनिधी आपले योगदान देतील अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाळासाहेब कदम यांनी दिली. 


 


कोविडचा प्रादुर्भाव आता ग्रामीणस्तरावर मोठ्या प्रमाणात होण्याच्या मार्गावर आहे. आजही ग्रामीण भागातील जनता याचा प्रसार रोखण्यासाठी जी त्रीसुत्री सांगितली आहे त्याचा वापर करतांना दिसत नाही. मास्क वापरणे, सतत हाताला स्वच्छ करणे, एकमेंकांपासून प्रत्येकांनी सुरक्षित अंतर ठेवणे याबद्दल ग्रामीण भागातील जनतेने कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी सांगितले. या मोहिमेसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने ज्या वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत त्याप्रमाणे नियोजन करीत प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवरील सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांपासून तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांनी ही मोहिम प्रत्येक घराघरात कशी रुजेल यासाठी स्वत:ला जोकून देऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 


 


प्रारंभी पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ग्रामस्थांना या मोहिमेच्या उद्घाटनानिमित्त जो संदेश दिला होता त्याचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी या मोहिमेचा उद्देश स्पष्ट करीत लोकसहभागाचे महत्व विशद केले. 


 


भोसी गावातील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग इरन्ना सिंगेवाड व उद्धव पांडुरंग साबणे या दोन ज्येष्ठ नागरिकांचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम यांनी तापमान व ऑक्सिजन मोजून प्रातिनिधीक शुभारंभ केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हा आरोग्य डॉ. शिवशक्ती पवार यांनी तर आभार सुभाष खाकरे यांनी मानले. 


000000


नांदेड..... कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात मी स्वत: शासन पातळीवरुन दक्ष असून शासनाकडून कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही फक्त तुम्ही स्वत: काळजी घेत आरोग्य विभागाच्या तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याला सहकार्य करा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.  



“माझे कुटूंब-माझी जबाबदारी” या मोहिमेच्या शुभारंभानिमित्त त्यांनी नांदेड येथील प्रभाग क्रमांक 10 च्या शिवनगर येथील स्थानिक रहिवासी दत्ता इंगळे व श्रीमती कुसूमबाई दराडे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, मनपा सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडिवाले, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, प्रभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी मो. बदीयोद्यीन, आशा वर्कस व इतर उपस्थित होते. 


 


दिवसेंदिवस कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणेची परिक्षा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नाबाबत माझ्या वारंवार प्रशासनाशी आढावा बैठका घेत असून आरोग्य सेवासुविधेची कुठलीही कमतरता पडणार नाही यासाठी नियोजन करीत आहे. आपल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नुकतेच आपण 80 खाटाचे दोन आयसीयू वार्ड अद्यावत केले आहे. यात 64 खाटा या आयसीयूच्या तर 16 खाटा या ऑक्सिजनच्या तयार केल्या आहेत. पुर्वीच्या 170 आयसीयू खाटांमधून ही नवी भर पडली असून आता अतीगंभीर जे बाधित आहेत त्यांच्यावर येथे प्राधान्याने उपचार केले जातील, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. काही प्रमाणात ऑक्सिजनचा वाहतुकीमुळे थोडा प्रश्नही निर्माण झाला होता. तथापि ऑक्सिजनचा कुठलाही तुटवडा नसून वाढत्या संख्येच्या प्रमाणात त्याचे योग्य व्यवस्थापन जिल्हा प्रशासनामार्फत आता अधिक प्रभावीपणे केले जाईल असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी श्रीमती कुसूमबाई दराडे यांच्याशी संवाद साधतांना सांगितले.