राज्य उत्पादन शुल्क विभागाचा धूम धडाका!!!  अवैध दारू विक्री करणार्‍यांना तडाका!!!

.


लातूर (एल. पी. उगीले) लातूर जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागातील उदगीर जळकोट देवणी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री चालू असल्याच्या तक्रारी प्रसिद्धी माध्यमातून चव्हाट्यावर आणल्या जात होत्या. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश बारगजे यांनी गांधी सप्ताहाच्या निमित्ताने धडाकेबाज मोहीम हाती घेऊन जिल्ह्यातील अनेक ठिकाणी धाडी घालून मोठ्याप्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणी धाडसत्र चालवले आहे. असे असले तरीही कुत्र्याच्या शेपटी प्रमाणे अवैध दारू विक्री करणारे पुन्हा पुन्हा दारूनिर्मिती, विक्री व वाहतूक करून झटपट श्रीमंत होण्यासाठी धडपडताहेत. काही ठिकाणी तर विषारी हातभट्टीची दारू गोर गरीब मजुरांच्या गळी उतरवली जाते आहे. याही गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन राज्य उत्पादन शुल्क लातूर विभागामार्फत विशेष मोहीम हाती घेऊन अवैध मद्य विक्री करणाऱ्या सहा ठिकाणी छापे मारून गुन्हे दाखल करत नऊ लाख 54 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरवर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान गांधी सप्ताह चे नियोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध बेकायदेशीर मद्य विक्री, निर्मिती व वाहतूक याविरोधात धडक मोहीम चालू करून जिल्ह्यातील अवैध हातभट्टी केंद्रावर छापे मारून तीन गुन्हे नोंदवले आहेत. यात एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पाच लिटर देशी व 780 लिटर हातभट्टी बनविण्याचे रसायन असे एकूण 19 हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही उदगीर विभागामार्फत एकाच वेळी उदगीर, देवणी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये उदगीर येथे एका टाटा इंडिगो एम एच 2 सी एल 83 06 या वाहनाचा पाठलाग करून दोन बॉक्स विदेशी दारू व 10 बॉक्स देशी दारू पकडण्यात आली. त्याचवेळी देवणी तालुक्यात एक चारचाकी कार इंडिका विस्टा एम एच 4 जेडी 34 21 या वाहनासह पाच विदेशी मद्याचे बॉक्स व पाच देशी मद्याचे बॉक्स तसेच एक चार चाकी टाटा सुमो एम एच 24 एल 45 93 ही गोवा राज्य निर्मिती दारू तीस बॉक्स देशी मद्य, 21 बॉक्स विदेशी मद्य घेऊन जात असताना जप्त करण्यात आली. याप्रकरणी चंद्रकांत रामराव कदम, अंकुश अर्जुन भांगे, हनुमंत गोविंद कोनाळे यांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये तिन्ही गुन्हे मिळून 409 लिटर देशी मद्य व 233 लिटर विदेशी मद्य व  267 लिटर पर राज्यातील विदेशी मद्य व वाहनांच्यासह नऊ लाख 54 हजार 490 रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लातूर विभागाचे निरीक्षक आर एम बांगर, दुय्यम निरीक्षक आर जी राठोड, दुय्यम निरीक्षक गणेश गोले, जवान अनिरुद्ध देशपांडे, निलेश गुणाले, हनुमंत मुंडे यांनी तर उदगीर विभागात निरीक्षक एम एन झेंडे, दुय्यम निरीक्षक बी.के. अवचार, दुय्यम निरीक्षक डी एस पाचफुले, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अनंत कारभारी, जवान एस जी काळे, जे आर पवार, एस एस साळुंखे यांनी परिश्रम घेतले. अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री याच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती अधीक्षक गणेश बारगजे यांनी दिली आहे.