महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2020-21 अंतर्गत फळबाग लागवड

लातूर,..... महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे तसेच लातूर जिल्हयामध्ये देखील फळपिकवाढीसाठी अनुकुल हवामान आहे. या वर्षी जिल्हयामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढलेली आहे. फळबाग लागवडीस चालना देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही शासनाची महत्वकांक्षी सुरु आहे या योजनेअंतर्गत वैयक्तीक लाभार्थ्यांच्या शेतावर कृषि विभागामार्फत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे.


या योजनेमध्ये प्रामुख्याने आंबा कलम,आंबा रोपे, चिकु, पेरु, डाळींब, मोसंबी, संत्री, कागदी लिंबु ई. पिकाचा समावेश आहे. योजनेमध्ये पात्र लाभार्थी म्हणून अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, दारीद्रय रेषेखालील लाभार्थी, भुसुधार योजनेचे लाभार्थी, इंदीरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषि कर्ज माफी योजना-2008 नुसार अल्प भुधारक व सिमांत शेतकरी, अनुसुचित जातीच्या व अन्य परंपरागत वन निवासी अधिनियम-2006 नुसार पात्र लाभार्थी सहभागी होऊ शकतात. फळबाग लागवड कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांचे नावे असलेले मग्रारोहयो योजनेचे जॉबकार्ड, शेतीचा 7/12 व 8 अ, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ई. कागदपत्राची आवश्यकता आहे.


या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले कार्यक्षेत्रामधील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी तसेच तालुका कृषि अधिकारी कार्यालाशी संपर्क साधुन सहभागी व्हावे. फळबागा लागवडीसाठी शासनाने डिसेंबर 2020 ही अंतिम मुदत निर्धारित केलेली आहे तरी देखील योजनेमध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी नोव्हेंबर 2020 अखेर सर्व लागवड पुर्ण करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.


योजने संबंधी शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी 02382-243949 या Whatsapp क्रमांकावर अथवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी लातूर या Facebook व्दारे आपल्या अडचणी मांडाव्यात.