.
लातूर (एल. पी. उगिले)
सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन नवीन ओळखी निर्माण करायच्या, फेसबूक, व्हाट्सअप यांच्या माध्यमातून महिलांची माहिती मिळवायची आणि त्यांच्याशी गोड गोड बोलून प्रेमाचे संबंध प्रस्थापित करायचे. जवळिकता निर्माण झाल्यानंतर आपण आर्थिक अडचणीत आहोत. असे भासवून त्यांच्याकडून आर्थिक मदतीची याचना करायची, आणि एकदा का ती महिला मदत करते म्हटले कि मग हळूहळू तिला लुबाडत सुटायचे. असा धंदा करणारे बरेच जण आहेत. वेगवेगळ्या अमिषाच्या माध्यमातून अधिक माहिती मिळवणारी ही बरेच जण आहेत. कधी तुम्हाला लॉटरी लागली आहे. तर कधी तुमचा मोबाईल क्रमांकने इतके पैसे जिंकली आहेत, तर कधी तुम्हाला कार, जीप अशी वाहने लॉटरी लागली असून त्यासाठी इतकी रक्कम भरा. असे सांगून लुबाडणारे ही सोशल मीडियावर कमी नाहीत. मात्र अशा ठगाला महाटग पोलीस अधिकारी भेटतात, तेव्हा मात्र त्यांचे पितळ उघडे पडते आणि जेलचीवारी नशिबी येते.
असाच काहीसा प्रकार लातूर शहरांमध्ये घडला आहे. लातूर शहरातील एका तीस वर्षीय विवाहित महिलेला सव्वा लाखाला लुबाडले होते. मात्र लातूरच्या सायबर सेलचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार राजेश कंचे, गणेश साठे या सायबर टीमने प्रेमाचे नाटक करून लुबाडणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. याकामी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले तसेच डी.बी. पथकातिल साहाय्यक फौजदार गणी शेख, युवराज गिरी यांनी या प्रकरणातील आरोपींना औरंगाबाद येथून अटक केली आहे. यासंदर्भात लातूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लातूर शहरातील एका विवाहित महिलेला निनावी फोन येतो. आपण जुने मित्र आहोत, असे सांगून ओळख वाढवतो. ओळख वाढल्यानंतर प्रेमाचे नाटक सुरू होते. लातूर एमायडिसी पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्यात असलेली ही तीस वर्षीय महिला, घरामध्ये एकटेपणा जाणवत असल्याने आणि मनाची कुचंबणा दूर करावी. या हेतूने जास्त माहिती न घेता सोशल मीडियावर फेसबुक, व्हाट्सअप अशा माध्यमातून मित्र-मैत्रिणी यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायची! तिच्या या स्वभावाचा गैरफायदा घेत, एका तरुणाने आपण दोघे मित्र आहोत. मला ओळखले नाहीस का? असे म्हणत तिच्याशी बोलणे सुरू केले. खात्री न करता कदाचित शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात आपला एखादा वर्गमित्र असू शकेल, या भावनेने तिनेही समोरून बोलणार्याला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर त्या तरुणाचा दररोज फोन येऊ लागला. एका मुलाची आई असलेल्या महिलेला त्याने आपल्या बोलण्यातून चांगलेच आकर्षित केले. प्रेमाच्या गोड गोड गप्पा मारून तिला भुरळ घातली. आपले मन मोकळे करण्यासाठी एखादा चांगला मित्र मिळाला तर चांगलेच असते! मात्र याठिकाणी हा भामटा तिला झुलवत होता. आपण काय करतो? याचे भान विसरून ती देखील त्याच्यासोबत मोबाईल वर चॅटिंग करू लागली. यातून त्यांचे कित्येक व्यक्तिगत पातळीवर असे बोलणे होऊ लागले. अगदी खाजगीतिल गप्पाही बिनधास्तपणे केल्या जाऊ लागल्या. यातूनच त्याने तिला सांगितले की," मी आजारी आहे, रुग्णालयात ऍडमिट झालोय, मला पैसे हवे आहेत". असे सांगितल्यानंतर 16 ऑगस्ट 2020 रोजी त्याला मोबाईल पे वरून दोन हजार रुपये पाठवले. त्यानंतर तिला आणखी आपल्या जवळ घेण्यासाठी आणि आपल्यावर विश्वास वाढवण्यासाठी, "तू तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे, तुला मी सांभाळतो" अशा पद्धतीच्या भावनिक साद घातली. ती हरवून गेली. हळूहळू त्याच्यामधे गुंतत गेली, आणि आपण प्रेमात किती गुरफटले जातोय?हे कितपत योग्य आहे? याची कसलीही फिकीर न करता, त्याच्या शब्दाला मान देत त्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्याने पैसे मागितले की पाठवण्याची तयारी दाखवली. आणि आपले दागिने विकून तिने बँक ऑफ महाराष्ट्रा च्या औरंगाबाद शाखेतील बँक खात्यावर एक लाख 14 हजार पाचशे रुपये पुन्हा पाठवले.
हे पैसे मिळाल्यानंतर त्याने सुजुकी एक्सेस ही स्कूटी खरेदी केली. आणि आपल्या मित्रासोबत मौजमस्ती करू लागला. त्यानंतर एके दिवशी त्याचा फोन आला. "तू जे समजतेस, तो मी नव्हेच! मी तुझा मित्र वगैरे काही नाही. आणि माझे खरे नावही तुला सांगणार नाही. मला दिलेल्या पैशाबद्दल तू कुठे वाच्यता केलीस तर आपले पर्सनल चॅटिंग आणि फोन कॉल रेकॉर्डिंग मी व्हायरल करेन, तुझी बदनामी होईल." असे सांगत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आपण या चक्रव्यूहात पुरते अडकले गेलोय. याची कल्पना येताच, सदरील विवाहित महिलेने एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले आणि सविस्तर तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 465/ 20 कलम 354 (ड) 504, 506 भारतीय दंड विधान संहिता तसेच आयटी च्या कलम 66 (ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्या व्यक्तीने फोन केलेला फोनचा नंबर, फोन पे वरून आणि औरंगाबादच्या बँक ऑफ महाराष्ट्रा च्या खात्यावरून लातूर सायबर सेलचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सहकाऱ्यांसह या महाभागांचा शोध लावला.
औरंगाबाद येथील रुपेश दगडू जाधव हा 27 वर्षे तरुण आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच रुपेश ने सदरील महिलेला ज्या खात्यावर पैसे पाठवायला सांगितले होते, तो अजय शिवराम निलाखे हा 31 वर्षीय तरुण असल्याचेही निष्पन्न झाले. हे निष्पन्न झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले आणि त्यांचे साथीदार सहाय्यक पोलीस फौजदार गणी शेख, युवराज गिरी या पथकाने दोन्ही आरोपींना औरंगाबाद येथून अटक केली, असून या पैशातून घेतलेली स्कूटी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशन अधिक तपास करत आहेत..