*विद्यार्थी रमले ग्रामीण भागातील शाळेत*

*उदगीर/ प्रतिनिधी*



        उदगीर तालुक्याती श्री. पांडूरंग विद्यालय, कल्लूर येथील शाळेत लॉकडाऊनच्या काळात संस्थेचे सचिव- विनायकरावजी बेंबडे साहेबांच्या प्रेरणेतून तसेच मुख्याध्यापक- नादरगे एस. व्ही. यांच्या मार्गदर्शनाने कलाशिक्षक- चंद्रदीप नादरगे यांनी कोरोना आजाराविषयी चित्राच्या माध्यमातून जनजागृती केल्यामुळे, तसेच अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्यामुळे, पालकांना एक आदर्श शाळा कशी असते याची प्रचिती झाली. तसेच याच काळात घर, परिसर, पर्यावरण, आरोग्य स्वच्छ ठेवण्याची तसेच योगासन, प्राणायाम अशा चांगल्या सवयींची बालक,


पालक, जनमानसात भावना जागृत केल्यामुळे आणि शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन केल्यामुळे आज या परिसरातील लोकांचे आरोग्य चांगले आहे.


           कोरोना आजारासंदर्भात चित्राच्या माध्यमातून बालक, पालक, महिला, तरुण आणि वृद्धांचे मनोधैर्य वाढविल्यामुळे त्यांचा मनातील भीती, ताणतणाव, नकारात्मक भावना दूर करून आरोग्यविषयक भावना जागृत करून 'शिक्षण आपल्या दारी' या उपक्रमातून प्रत्यक्ष पालक भेटीतून पालकांचा आत्मविश्वास वाढविल्यामुळे आणि शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करत दर्जेदार शिक्षण आपल्या पाल्याला मिळावे म्हणून इयत्ता- 9वी व 10वी च्या विद्यार्थ्यांना पालक स्वतः नियमित शाळेत पाठवितात. 


          कोविड-19 या विषयासंदर्भात माउंटबोर्डवर अनेक घोषवाक्य लिहून विद्यार्थ्यांत जनजागृती करण्यात आली आहे. त्याचबरोबर मास्कचा नियमित आणि 100% वापर करण्यास विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. शालेय परिसराची व वर्ग खोल्याची स्वच्छता/निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, सॅनिटाइझर, हँडवॉश, अशा उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे राज्य व केंद्र शासनाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून ग्रामीण भागातील श्री पांडुरंग विद्यालयात, कल्लूर येथे 9वी व 10वी च्या वर्गाचे नियमित अध्यापन चालू आहे. विज्ञानाची आरोग्यविषयक/पर्यावरणपूरक माहिती, इंग्रजीचे व्याकरण, गणिताचे नवनवीन प्रश्न सोडविण्यात विद्यार्थी रमून जात आहेत. श्री पांडूरंग विद्यालयाचा लळा विद्यार्थ्यांना लागल्यामुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांत भर पडत आहे.