*बंजारा भाषिक विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक हस्तपुस्तिकेचे अनिल मुरकुटेंच्या हस्ते प्रकाशन*

.


लातूर...... 


     संविधान दिनाचे औचित्य साधत औसा शिक्षण विभागातील विषय तज्ञ किशोर सोनवणे यांच्या संकल्पनेतून इयत्ता पहिली वर्गाला शिकवणार्‍या तांड्यावरील मराठी भाषिक शिक्षकांना बंजारा भाषिक विद्यार्थ्यांशी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत येत असलेल्या भाषिक समस्या निवारणात सहाय्यक ठरेल अश्या भाषा अध्ययन अध्यापन सुलभीकरण कृतीपत्रिका या पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ पार पडला.


       यावेळी अध्यक्ष म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल मुरकुटे तर प्रमुख पाहुणे म्हणून संपर्क अधिकारी जेष्ठ अधिव्याख्याता मा.राजेंद्र गिरी,जिल्हा गुणवत्ता कक्ष सचिव जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. भागीरथी गिरी , गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती.


       आपल्या अध्यक्षीय भाषणात मुरकुटे साहेबांनी उपस्थितांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे कसे आवश्यक आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम दिसून येतो याविषयी संवाद साधला.सोबतच ही पुस्तिका जिल्ह्यातील सर्व तांड्यावरील शाळेत कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तर भागीरथी गिरी मॅडम यांनी संविधानातील मूळ उद्देश सर्वांसाठी शिक्षण ते प्रत्येक विध्यार्थी कसा शिकेल या प्रवासाचा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात कसा अंतर्भाव केला आहे.याविषयी मार्गदर्शन केले. तसेच राजेंद्र गिरी सर यांनी ज्ञानेश्वरी,श्यामची आई यातील दाखले देत सद्यस्थितीत मातृभाषेतून शिक्षण देत संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले तर समाजात बदल घडवून आणणे शक्य आहे असे उपस्थितांना आवाहन केले.


         कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन आणि संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करून झाली. सूत्रसंचालन अनिरुद्ध वाघमारे यांनी, प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी श्रीमती अनुपमा भंडारी यांनी गीतगायन श्री ज्ञानोबा कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन सविता सानप मॅडम यांनी केले. पुस्तकनिर्मिती प्रक्रियेचे अनुभवकथन माधव राठोड आणि किशोर सोनवणे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय राठोड यांनी परिश्रम घेतले.


          या प्रसंगी औसा तालुक्यातील विविध तांड्यावरील सर्व शिक्षक,केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, बी आर सी कर्मचारी,तसेच सर्व शिक्षणप्रेमी यांची प्रमुख उपस्थिती होती.