श्री पांडूरंग विद्यालयाच्या भिंती झाल्या बोलक्या

.


उदगीर....... 


          उदगीर तालुक्याती श्री पांडूरंग विद्यालय, कल्लूर येथील कलाशिक्षक- नादरगे चंद्रदीप बालाजी यांनी लॉकडाउन चा उपयोग घेत संस्थेचे सचिव- बेंबडे साहेबांच्या प्रेरणेतून शाळेतील भिंतीवर भारत देशाचा, महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा, लातूर जिल्ह्याचा नकाशा, संविधान, पसायदान, राष्ट्रगीत, सर्व शिक्षा अभियानाचा बोर्ड, शाळेचा बोर्ड अशी विविध रंगरंगोटीही केली आहे. त्यामुळे श्री पांडूरंग विद्यालयातील सर्व भिंती बोलक्या झाल्या आहेत. त्याचबरोबर शालेय वातावरण प्रसन्न दिसून येत आहे. मुख्याध्यापक- नादरगे एस. व्ही. यांच्या मार्गदर्शनाने कलाशिक्षकांनी कोविड-19 या विषयासंदर्भात माउंटबोर्डवर अनेक घोषवाक्य लिहून विद्यार्थ्यांत जनजागृती करण्याचे काम केले आहे.


          राज्य शासनाने 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, संस्थाचालकांना मार्गदर्शक सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या होत्या. त्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपण्यास प्राधान्य दिले आहे. शासनाने सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आता सोमवार पासून शाळा सुरू झाल्यामुळे शालेय परिसराची व वर्ग खोल्याची स्वच्छता/निर्जंतुकीकरण करून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, सॅनिटाइझर, हँड वॉश, अशा उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून ग्रामीण भागातील श्री पांडुरंग विद्यालयात 9वी व10वी चे वर्ग सुरू करण्यात आले.


           ग्रामीण भागातील मुलांच्या भवितव्याचा विचार करूनच शासनाने 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा चालू केल्या असाव्यात. शाळा चालू झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी-पालकांत आनंदाचे वातावरण दिसून आले. परंतु काही ठिकाणी अजून कोरोनाचे संकट टळले नाही. तसेच कोरोनाची दुसरी लाट येणार की काय? म्हणून विद्यार्थी-पालकांत चिंताही दिसून आली. असे असले तरीही संमिश्र प्रतिसाद ग्रामीण भागातील शाळेत दिसून आला आहे.