*चैतन्याचा मोहर फुलवणारी पावन भूमी : हत्तीबेट महात्म्य* प्रा. रामदास केदार

.


उदगीर 


 


 


चैतन्याचा मोहर फुलवणारी आणि प्रसन्नतेची भूपाळी गात पहाट उजळणारी पवित्र, पावन भूमी म्हणजे हत्तीबेट तीर्थक्षेत्र होय. या हत्तीबेटाचे महात्म्य ओवी रुपातून रसाळपणे आणि भावपूर्ण शब्दात कवयित्री सुनंदा सरदार यांनी मांडलेली आहे. सात अध्यायात या महात्म्याची मांडणी केली असून हत्तीबेटाची खरी ओळख करून देण्याचा प्रयत्न लेखिकेने हत्तीबेट महात्म्य या ग्रंथातून केला आहे. पहिल्या अध्यायात लेखिकेने देवर्जन गावाच्या परिसरात हत्तीबेट तीर्थक्षेत्र असल्याने या गावाची ओळख प्रत्यक्ष ईश्वराची प्राप्ती झाली आहे ज्या गांवी वसले आहे देव नदी काठी त्याचे नांव देवर्जन या गावाविषयी व श्री. सद्गुरू गंगारामबुवा महाराजांनी देवर्जन-हत्तीबेट रस्त्यावर लावलेल्या वटवृक्षाची, दुस-या अध्यायात प्रभूश्रीराम ,लक्ष्मण व सीतामाई यांचा पदस्पर्श हत्तीबेटास झाला उल्लेख असून या बेटावर सर्व देव देवतांची जप साधना व यज्ञ केल्याचा उल्लेख येतो. तिस-या अध्यायात गजेंद्रांची झालेली स्थिती वर्णन केले गेले आहे. चौथ्या अध्यायात स्वामी समर्थांची मूर्ती, नारकर महाराज हत्तीबेटावर येवून हत्तीबेट तीर्थक्षेत्राविषयी सांगितलेले महत्त्व व हत्तीबेट पर्यटन स्थळाला राज्यशासनाकडून मिळालेला पर्यटनाचा"ब"दर्जा याचा उल्लेख आलेला आहे. पाचव्या अध्यायात कर्दळीवनात यात्रेच्या प्रसंगाचे सुंदर वर्णन आलेले आहे. तसेच स्वामी समर्थ नवीन अवतारात तीनशे वर्षांनी प्रकट झाले असल्यांचा उल्लेख केलेला आहे. सहाव्या अध्यायात हत्तीबेटांचे लौकिक व विकास यांचा उल्लेख केला आहे. संत,महंताच्या, देव, देवतांच्या पाऊलांने हत्तीबेटाची ही माती पवित्र आणि पावन कशी झाली? या मातीचा गंध,सुगंध कसा या परिसरात दरवळतो आहे?भाव भक्तीचा मळा कसा या बेटावर फुलतो आहे? हे या रसाळ ओव्या वाचल्यानंतर आपणास कळते आणि मग आपलेही पाऊल या प्रसन्न आणि चैतन्याने बहरलेल्या बेटाकडे वळायला लागते. झाडफुलांनी, वेलीपानांनी नटलेल्या या निसर्गरम्य या बेटावर सद्गुरू गंगानाथ महाराज यांची संजीवन समाधी,श्री. दत्त मंदिर, बालाजी मंदिर, श्री. स्वामी समर्थ मंदिर आहे. या हत्तीबेटामुळे देवर्जन गावची ओळख महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर झालेलीआहे. दर एकादशी व पोर्णिमेला या बेटावर कीर्तन, प्रवचन व अन्नदानाचा आनंदी सोहळा पार पडत असतो. गंगानाथ बुवांच्या पारमार्थिक अधिकाराची प्रचिती येते. वैदिक काळापासून या मातीला इतिहास लाभलेला आहे. अनेक ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केली आहे. रामपुरी महाराजांच्या प्रेरणेने या ठिकाणी दत्त महाराजांच्या मुर्तींची प्राण प्रतिष्ठा झाली. दहा कोरीव लेण्या, सहाशे मीटर लांबीची गुहा, तसेच जुने अवशेष आणि शिलालेख आजही या ठिकाणी पहावयास मिळतात. येथील जागेची आख्यायिका खूप जुनी आहे. अनेक साधूसंत येथे येऊन गेल्यांचा उल्लेख यात आलेला आहे. 


       सुनंदा सरदार यांनी या पवित्र अशा ग्रंथातून परिसरांची ,येथील संस्कृतीची, भाव -भक्ती -श्रद्धेची खरी ओळख करून दिली आहे. या बेटाला भौगोलिक वारसाही आहे. अंतःकरणात भक्तीचा ओलावा असेल तर ओसाड माळरानावरही नंदनवन फुलवता येते. ही प्रचिती पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी यांना आली असावी. आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नातून या माळरानाला नंदनवनाचे रुप प्राप्त नक्कीच झाले आहे अनेक मान्यवरांना या हत्तीबेटाचे महत्त्व सांगत तेथे सुविधा करुन, अनेक झाडे लावून, जनजागृती करुन या भक्तीस्थळाला पवित्र बनवण्याचे कार्य व्ही. एस. कुलकर्णी यांनी केले आहे. ही साक्ष हा ग्रंथ नक्कीच देतो. या ग्रंथाचे प्रकाशक असलेले व्ही. एस. कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात"ज्या माणसाच्या ठायी सत्य,पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती या तीन गोष्टी असतील तर त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही, ह्या तीन गोष्टी असल्यावर अखिल विश्व जरी विरोधात उभे ठाकले तरी त्याला तो एकटाच माणूस सहज तोंड देवू शकेल" हे स्वामी विवेकानंदाचे वाक्य कायम स्मरणात ठेवून हत्तीबेटाचे कार्य सेवा सुरूच ठेवल्याचे त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे.त्यांच्या कार्याचे कौतुक या लेखिकेने या ग्रंथातून केले असले तरी आज खरचं पर्यटन स्थळ, भक्ती स्थळ म्हणून हत्तीबेट नावारूपाला आले आहे. संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे हत्तीबेटाचा परिसर वृक्षवल्लीने फुलला आहे. ही सगळी ओळख या पुस्तकाने करून दिली आहे. एक पवित्र, प्रसन्न, चैतन्यमय भूमी म्हणून या हत्तीबेटाचा इतिहास आहे हे नक्कीच म्हणावे लागेल. हे महात्म्य वाचत असताना या परिसरांची ऐतिहासिक, भौगोलिक परिस्थितची ओळख तर होतेच पण भक्तींचा मळा फुलत असल्याने संत सहवासाचा गंध दरवळतो आणि मन मात्र प्रसन्न होऊन जाते. असा हा ओवीबध्द असलेला ग्रंथ सुनंदा सरदार यांनी रचलेला आहे. त्यांच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा! 


 


           प्रा. रामदास केदार 


            9850367185