कोरोना नियंत्रणात, मात्र हलगर्जीपणा नको— मुख्याधिकारी राठोड 

.


उदगीर (एल.पी. उगिले) उदगीर शहरात आणि परिसरात ही कोरोना नियंत्रणात आला आहे. यामुळे जिल्ह्यात 11 कोवाड सेंटर ही बंद करण्यात आले आहेत. तरीही नागरिकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. काही देशात कोरोनाची दुसरी लाट दुप्पट वेगाने आली आहे. त्यामुळे कोणताही हलगर्जीपणा अंगलट येऊ शकेल. याचे गांभीर्य नागरिकांनी बाळगून काळजी घेणे गरजेचे आहे. असे विचार उदगीर नगर परिषदेचे कोरोना योद्धा मुख्याधिकारी भारत राठोड यांनी व्यक्त केले आहेत. सध्या दीपावलीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने खरेदीसाठी झुंबड उडत आहे. ही गर्दी टाळणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळणे काळाची गरज आहे. असेही आवाहन मुख्याधिकारी राठोड यांनी केले आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेले आदेश आणि सूचना तंतोतंत पाळाव्यात. यासोबतच साथीचे रोग पसरणार नाहीत, यादृष्टीने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. ओला कचरा आणि कोरडा कचरा वेगळा करून घंटागाडी वाल्याकडे सोपवावा. मल आणि घाण रस्त्यावर टाकू नये. या ही दक्षता उदगीरकरांनी बाळगाव्यात असेही आवाहन केले आहे. गेल्या मार्च महिन्यापासून उदगीर शहरात कोरोना चे संकट आले होते. मध्यंतरीच्या काळात तर ही साथ चांगलीच वाढली होती. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी काटेकोर भुमिका पार पाडत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे कोरोना नियंत्रणात आलेला आहे. कोरोना आज नियंत्रणात आला असला तरीही तो पुन्हा वाढू नये यादृष्टीने खबरदारी घेण्याची नैतिक जबाबदारी नागरिकांची आहे. याचा गांभीर्याने विचार करून नागरिकांनी प्रशासनाला साथ द्यावी. असेही आवाहन मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केले आहे.