..
पूर्व आशियातील तैवानमध्ये झाला शिवजन्मोत्सव सोहळा
तैपेई/तैवान
मराठी माणसाचा मानबिंदू असल्येल्या छ. शिवाजी महाराजांची जयंती विदेशात देखील साजरी होत आहे. पूर्व आशियातील तैवान मध्ये देखील यंदा शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील मराठी मंडळ तैवानतर्फे २८ फेब्रुवारीला या उत्सवाचे नॅशनल चिंग-व्हा युनिव्हर्सिटी, सिंचू येथे आयोजन करण्यात आले होते.
मराठी मंडळ तैवान ही तैवानमधील मराठी लोकांची संस्था आहे. याव्दारे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत मराठी लोकांना एकत्र आणत संस्कृती रक्षण आणि उत्सव, परंपरा जपण्याचे कार्य करण्यात येत आहे. यावेळी शिवजयंतीचे औचित्य साधत सुंदर असा शिवजन्मोत्सव सोहळा आणि मराठी मंडळ तैवानच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उदघाटक म्हणून हिंगोली येथील वसमत शहराचे आमदार चंद्रकांत (राजूभय्या) नवघरे ऑनलाईनच्या माध्यमातून उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी देखील आपल्या शुभेच्छा कळवल्या होत्या.
भगवेमय वातावरणात पार पाडलेल्या या कार्यक्रमाला सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि दुर्ग संवर्धन समिती महाराष्ट्र चे सदस्य श्रमिक गोजमगुंडे यांनी झूम-ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले. छ. शिवाजी महाराजांचा वारसा टिकवायचा असेल तर गड-किल्ले आणि आपल्या परंपरा जपणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची योग्य अशी काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांसाठी हा ठेवा जपता येईल. शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्यपद्धतीचा अवलंब करत प्रत्येक मराठी माणसाने प्रगती करावी, असे श्रमिक गोजमगुंडे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये पूनम बोऱ्हाडे यांनी पोवाडा,अश्विनी बर्वे यांनी शिवजन्मोत्सवाचा पाळणा, कल्याणी भोसले-पेंढारकर यांनी मराठी अभिमान गीत सादर केले. तैवानमधील मराठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मंडळातर्फे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अमित ससाणे, पूजा परांडे, नयना नारखेडे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. भगवे फेटे व झेंडे घेऊन मोठ्या उत्साहात तैवान मधील मराठी मंडळी या उत्सवात सहभागी झाली होती. सहभोजन व सायंकाळी सिंचू शहरात मिरवणुकीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पंडित आंब्रे व रोहन पाष्टे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि डॉ. बालाजी बर्वे व सयाजी मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच डॉ. मनोज पाटील व डॉ. संदीप वाघ यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पहिले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय मदने, रेवण कट्टे, धैर्यशील चेंडके, दिपाली केस्तवाल, अमोल नारखेडे, राम आंब्रे, अजित जगताप, सुनील तरगे, शुभम नवले, अतुल लांजेवार, कृष्णा बोर्डे, राजेंद्र परांडे, सुहास बावीकर, राहुल कर्डीले, बालाजी काळे, अभिजीत शेळके, अक्षय नरोड़े, अभय झाब्रे, सचिन कवड़े, अविनाश पाटील,सागर कुलकर्णी, अनिकेत हंसे, सुदर्शन कलेल, विनायक घोरपडे,अखिल खेडुळकर, आणि सिंचू येथील मराठी मंडळींनी विशेष परिश्रम घेतले.