*वीज वितरण कंपनीने देखभाल दुरुस्तीवर बारकाईने लक्ष ठेवावे* *-ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे*

 जिल्ह्यातील लहान पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर घेण्याबाबतचे प्रस्ताव नियोजन समितीला सादर करावेत*


*शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीज जोडणी खंडित करू नये, वीज बिल भरण्याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे*








लातूर, ...... वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील नागरिकाकडून विजेच्या लोंबकळणाऱ्या तारा, रोहित्रे आदीच्या तक्रारीबाबत तात्काळ कार्यवाही करून त्या तक्रारींचा निपटारा करून वीज ग्राहकांना तत्पर सेवा देणे अपेक्षित आहे. त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखभाल व दुरुस्ती वर लक्ष ठेवून ग्राहकांच्या तक्रारीचा वेळेत निपटारा करावा, असे निर्देश ऊर्जा, नगर विकास, मदत व पुनर्वसन, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले.

      औसा तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित औसा तालुक्यातील ऊर्जाविषयक कामाबाबत च्या आढावा बैठकीत उर्जा राज्यमंत्री तनपुरे बोलत होते. यावेळी संसदीय कार्य, पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे औसा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अफसर शेख, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता जी.आर. घोलप, अधीक्षक अभियंता भोईर, महापारेषण चे अधीक्षक अभियंता जाधवर, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी यांच्यासह शेतकरी व अन्य नागरिक उपस्थित होते.

       ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे पुढे म्हणाले की शेती पंपाच्या वीज बिलाच्या थकबाकी बाबत वीज वितरण कंपनीने त्या त्या भागातील जिरायती जमीन आदी बाबींचा विचार करून शासनाने ठरवून दिलेले 80 टक्के वीज बिल भरण्याची मर्यादा शिथिल करून त्यांना सवलत देण्यास हरकत नाही. वीज बिलाच्या थकबाकी मुळे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज जोडणी खंडित करू नये, तर शेतकऱ्यांना सवलत देऊन येणाऱ्या पिकावर विज बिल भरण्याबाबत प्रबोधन करावे. तसेच शेतकऱ्यांनीही त्यांच्याकडे पैसे आल्यास थोडे थोडे करून वीज बिल भरावे, असे आवाहन त्यांनी केले.

    शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते संबंधित पुरवठादार यांनी वाहतूक करून घेऊन जावे व ते तात्काळ दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. रोहित्र दुरुस्ती बाबत शेतकऱ्यांच्या पुढील काळात तक्रारी येता कामा नयेत याबाबत वितरण कंपनीने योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश श्री. तनपुरे यांनी दिले. तसेच वीज वितरण कंपनीने लातूर जिल्ह्यातील लहान ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर घेण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करून त्यासाठी निधी मंजूर करून घ्यावा व गावातील पाणी पुरवठा योजनांच्या वीज बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

      प्रारंभी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वीज वितरण कंपनीचा औसा तालुक्यातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन नागरिकाच्या तक्रारीच्या अनुषंगाने ग्राहकांना तत्पर सेवा देण्याबाबतचे निर्देश दिले. यावेळी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर अनेक शेतकरी व वीज ग्राहकांनी नाराजी व्यक्त करून कारभार सुधारणा करून ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

         **********