मानवी विषम व्यवस्थेच्या अमानुष क्रौर्याची कहाणी म्हणजे बिराड होय*.    ---  डॉ.अनंता सूर

 .



उदगीर.......         पोटातल्या भुकेसाठी दुःख आणि वेदनेच्या गाठोड्याच ओझं डोक्यावर घेऊन गावोगावी फिरणाऱ्या, पावला पावलावर अपमानित होत पशुतुल्य जीवन जगणाऱ्या माणसांची होरपळ आणि  मानवी विषम व्यवस्थेच्या अमानुष क्रौर्याची कहाणी म्हणजेच बिराड होय असे मत डॉ.अनंता सूर यांनी व्यक्त केले

             चला कवितेच्या बनात या चळवळीच्या माध्यमातून अमर्याद ज्ञान मर्यादित वेळेत प्राप्त करून घेणे आणि आजच्या पिढीत वाचन संस्काराची रुजवणूक व्हावी यासाठी अविरत आणि सातत्याने वाचक संवाद चालू आहे. या मालिकेतील २५२ वे पुष्प गजानन महाराज म. मुकुटबन जि.यवतमाळ येथील मराठी विभाग प्रमुख तथा चंद्रपुर येथील शब्दांगण चे संस्थापक अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक डॉ अनंता सूर यांनी अशोक पवार लिखित बिराड या साहित्यकृतीवर संवाद साधताना अशोक पवार यांची जीवन कहाणी अत्यंत प्रभावीपणे मांडली. प्रसिद्ध साहित्यिक तथा वक्ते डॉ.बालाजी घारूळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या वाचक संवादात पुढे बोलताना डॉ सूर म्हणाले वाचकाला पानोपानी अस्वस्थ आणि सुन्न करणारं बेलदार समाजाचं जगणं.भूक आणि भिक, दारिद्रय आणि गुन्हेगारीच्या विळख्यात सापडलेल्या ज्वलंत दुःखाची गाथा व बेलदार समाजातील एका पोरक्या बापाची आत्मकहाणी आहे.हे सांगतानाच बकरीच्या मेजवानी चा प्रसंग, शिक्षणाबाबत चा निर्णय, वस्तीग्रहातील अन्यायाबाबत ची पहिली लढाई, निराशा कशी निर्माण होते आणि  समाजासाठी सुधारणावादी दृष्टिकोन अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकला.

यावेळी झालेल्या चर्चेत अनेकांनी सहभाग नोंदवला. उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली.पाहुण्यांना सन्मान चिन्ह, आभार पत्र आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना डॉ घारूळे म्हणाले की वर्‍हाडी भाषेचा गोडवा सदर कादंबरीस अधिक समृद्ध बनवला. यातले कथानक अतिशय वेदनादायी असून स्त्रियांची विटंबना असाह्य आहे. लेखक ,वाचक आणि वक्ते यांचे दृढ नाते जोडणारी वाचक संवाद हि चळवळ एकमेवाद्वीतीय आहे असे गौरवोद्गार काढले.

   शासकीय दूध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ म.ई.तंगावार यांनी केले तर आभार कु. प्रतिक्षा लोहकरे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा राजपाल पाटील, मुरलीधर जाधव, विरभद्र स्वामी व अनंत कदम यांनी प्रयत्न केले.